Tuesday, 24 July 2012

eityarth marathi masik


ईत्यर्थ मासिकाचा हा दुसरा अंक. हा अंक ज्येष्ठ साहित्यिक  दत्ता हलसगीकर ऊर्फ़ “दादा” यांच्या स्मृतीला अर्पण करीत आहोत. मराठीतील नव्या साहित्यिकांना ऊर्जा देणार्‍या दादांची कमतरता कायम जाणवत राहील. त्यांच्यावरचा एक उत्कृष्ट लेख अविनाश भोमे यांनी लिहिला आहे. याच अंकात कवयित्री शांता शेळकेंच्या स्वभावाचे विविध पैलू दाखवणारा प्रा. उपेंद्र चिंचोरे यांचा लेख आहे. आणि हिंदीतील पहिल्या सुपरस्टारच्या जादूई कारकिर्दीवर लेख लिहीला आहे अबुधाबीचे आमचे लेखक प्रशांत कुलकर्णी यांनी. हे तिन्ही लेख वाचायलाच हवेत.
जर तुम्हाला थरारकथा आवडत असतील तर माणिक्डोहचा ट्रेक वाचायलाच हवं. धवलध्रुव यांची वेगवान शैली कशी वाटली ते कळवा. आणि शाळांची सुरुवात होताना तुम्हाला जर नोस्टाल्जिक वाटत असेल तर अलका असेरकरांच्या शाळेचे अनुभव वाचण्याचा आनंद घ्या.
खुसखुशीत वाचायला आवडत असेल तर आनंद घारेंचा सदानंद आणि स दा रडके हा लेख वाचा. आरशात पाहिल्यासारखं वाटलं तर त्याला इलाज नाही. मानवी स्वभावाची वीण त्यांनी इतक्या नेमक्या शब्दांत पकडली आहे की वाचक हरवतोच. सागर कोकणे यांचा “आमचे क्लासेस जॉईन करा” वाचतानाही आपल्याच घरातल्या घटनांची पुनरावृत्ती पाहिल्याचं जाणवेल. त्यांनी घातलेलं अंजन थोडं झणझणीत आहे, पण आज त्याची आवश्यकता आहे.
विशाल कदम यांनी घेतलेली गांवपाटलांची मुलाखत वाचताना मात्र थोडी सावधगिरी बाळगा. कॉंप्युटरकडे बघून खिक खिक हसायला लागलात तर बघणार्‍यांचा गैर समज होऊ शकतो.
एकूण हा एक मस्त एंजॉय करायचा अंक आहे. वाचा. इतरांना वाचायला द्या. तुम्हाला आवडलेल्या लेखकांना पत्र पाठवा. त्यांचे ई मेल आय डी दिले आहेत. आम्हालाही कळवा काय आवडलं आणि काय नाही ते.


author
Salil Chaudhary
Founder - Netbhet Web Solutions and Netbhet eLearning Solutions, Techie, Blogger, Social media and Startup enthusiast !